सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी – खा. सुप्रिया सुळे

पुरंदर, १४ सप्टेंबर २०२२ : “मागील आठवड्यात पावसामुळं पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. मविआचं सरकार अशा बाबतीत तातडीने मदत करीत होतं. सत्ता ओरबाडून घेतली मात्र कामाची सुरुवात होताना दिसत नाही. अडीच महिने झाले सरकार बदललं पण अजून पालकमंत्री नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे असं मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

     
पुरंदर तालुक्याच्या दक्षिण – पुर्व पट्टयात  मुसळधार पाऊस झाल्याने गुळूंचे, राख, रणवरेवाडी, कर्नलवाडी या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या, या दरम्यान सुळे बोलत होत्या.

     
सुप्रिया सुळे सोमवार (दि.१२) पासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेताची सुप्रिया सुळेंनी पाहणी केली. पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, झिरिपवस्ती, गुळुंचे, थोपटेवाडी, नीरा या गावांसह अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेताला सुप्रिया सुळेंनी भेट दिली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यंनी सरकारकडं केली.

 
जसं एका दिवसात २० मंडळाच्या गणपतीला गेलात, तसा एक दिवस आम्हाला द्या…  

मी मुख्यमंत्री यांना विनंती करते, जसं एका दिवसात २० मंडळाच्या गणपतीला गेलात, तसा एक दिवस आम्हाला द्या. आम्ही २० गावांत त्यांना नेतो. महाराष्ट्रात आता २ मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री हवे आहेत. एक कार्यकर्त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मुख्यमंत्री मंत्रालयात बसून शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा