ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी आपत्कालीन संपर्क प्रणाली आता कार्यान्वित झाली आहे. ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सेवेमुळे आता संकटाच्या वेळी मदतीसाठी एक व्यक्ती कॉल करताच, परिसरातील हजारो नागरिकांशी एकाच वेळी संपर्क साधता येणार आहे.
यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने आणि सामूहिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपघात, आग, चोरी, दरोडा, बिबट्याचा हल्ला, सर्पदंश, वैद्यकीय अडचण किंवा नैसर्गिक आपत्ती अशा कोणत्याही संकटकाळात ही यंत्रणा गावपातळीवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे. या यंत्रणेचा टोल फ्री नंबर १८००२७०३६०० असून, नोंदणी केलेल्या व्यक्तीने यावर फोन केल्यास त्याचा संदेश थेट कॉल स्वरूपात गावातील नागरिकांच्या मोबाइलवर ऐकू जातो.
सध्या पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धाराशिव अशा सात जिल्ह्यांतील ४३८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही सेवा सुरू आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यांतील ३० पोलिस ठाण्यांतर्गत गावांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत तर मिळतेच, पण त्याचबरोबर गावात सुरक्षिततेची भावना वाढते, अफवांना आळा बसतो आणि प्रशासनाला ग्रामस्थांशी जलद संवाद साधता येतो.
हे आहे आवाहन
गावातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंक किंवा ॲपद्वारे आपला मोबाइल नंबर त्वरित नोंदवावा. ही सुरक्षा यंत्रणा केवळ चोरी किंवा अपघातासाठी नाही, तर तातडीच्या ग्रामसभा, शाळा सूचना, रेशन वाटप, पिसाळलेला कुत्रा, महिला छेडछाड आणि सतर्कतेच्या इशाऱ्यांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सरकारच्या या महत्त्वपूर्ण पुढाकारामुळे गावांमध्ये सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची पातळी उंचावली आहे. पोलिस ठाणे या यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा ‘संजीवनी’ ठरणार असून, सर्वांनी तिचा वापर करणे आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































