नारीशक्तीचा गौरव! आदिशक्ती अभियानात ग्रामपंचायतींना ‘दहा लाखां’पर्यंत बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘आदिशक्ती अभियान‘ (Adishakti Abhiyan) सुरू केले आहे. महिला व बालविकास विभागामार्फत ग्रामीण भागात हे महत्त्वाकांक्षी अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राबवले जात असून, ज्या ग्रामपंचायती उत्कृष्ट काम करतील, त्यांना थेट राज्यस्तरावर दहा लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक पुरस्कार जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

हे अभियान केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला सशक्त बनवण्याचे एक मोठे पाऊल आहे. अभियानाचे मुख्य उद्दिष्ट महिलांसाठीच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवणे आहे.

पुरस्कारांची लयलूट आणि उद्दिष्ट

या अभियानात ग्रामपंचायतींच्या कामाचे मूल्यांकन तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर होणार आहे. राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रामपंचायतीला १० लाख रुपये, द्वितीय पुरस्कार विजेत्याला ५ लाख रुपये आणि तृतीय पुरस्कारासाठी २.५ लाख रुपये इतकी भरघोस रक्कम दिली जाणार आहे.

पुरस्कारासोबतच, महिलांना नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी ग्रामसभेमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे, हुंडा आणि बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथांना प्रतिबंध करणे, तसेच महिलांना आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक स्तरावर जागरूक आणि सक्षम बनवणे, हे या अभियानाचे मुख्य उद्देश आहेत.

महिला सक्षमीकरणाच्या या महायज्ञात सक्रिय सहभाग घेऊन, ग्रामपंचायतींना गावाचा विकास साधण्यासोबतच मोठा मान आणि पुरस्कार जिंकण्याची ही दुहेरी संधी आहे. महिलांनी आणि ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे