हामदाबाज, सातारा, २ फेब्रुवारी २०२४ : हामदाबाज ता. सातारा येथील फाट्यावर असलेल्या सातारा-मेढा रस्त्यावर भीषण झालेल्या चारचाकी अपघातात आजोबा व चिमुकला नातू ठार झाला आहे. तर या चारचाकी मधील एकाच कुटुंबातील लहान मुलासह चारजण गंभीर जखमी झाले आहे.
नामदेव पांडुरंग जुनघरे (वय 55) रा. सावली, ता.जावली आणि त्यांचा तीन महिन्याचा चिमुकला नातू अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर सुवर्णा नामदेव जुनघरे (वय 48), प्रसाद नामदेव जुनघरे (वय 26), आरती नामदेव जुनघरे (वय 24) सर्व रा. सावली-मेढा, तसेच पूजा अमर चिकणे (वय 27), अन्वी अमर चिकणे (वय 4) रा. गांजे, ता. जावली अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. नामदेव जुनघरे हे मेढा येथील शिक्षक बँकेत कार्यरत असून ते बँकेस साप्ताहिक सुट्टी असल्याने कुटुंबीयांसमवेत पाली येथील देवदर्शनासाठी निघाले होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जुनघरे परिवार चारचाकी गाडी घेऊन मेढ्याहून पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान हामदाबाज येथील रस्त्यावर भरधाव असलेल्या या गाडीच्या चालकाचा ताबा सुटून पुलावरील कठड्यास जोरदार धडकली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन ठार झाले असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गाडीचा चुरा होऊन मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. या भीषण अपघातामुळे जखमींना बाहेर काढताना युवकांना नाकी नऊ आले होते. अपघातामुळे चारचाकी गाडीतील सीएनजी गॅस लिकेज होऊन चिमुकले बाळ गुदमरले होते. संबंधित युवकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. या घटनेने परिसर हादरून गेला असून अपघातस्थळी रक्त व काचांचा सडा पडलेला होता. अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर वायदंडे करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले