पुरंदर मधील आजी-माजी सैनिकांनी केली माहूर येथील मृत सैनिकाच्या कुटूंबाला मदत

6

पुरंदर, दि.९ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील माहूर येथील जवानाचा महिन्यापूर्वी  जम्मू मध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या कुटूंबायांना पुरंदर मधील आजी-माजी सैनिकांनी एकत्र येत ७५  हजार रुपयाची मदत केली आहे. फिक्स  डिपॉजिटच्या स्वरूपातील ही रक्कम असून, आजी-माजी सैनिकांनी  डिपॉजिटची पावती चव्हाण यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली आहे.

पुरंदर तालुक्यातील माहूर येथील एक जवान जम्मु ते दिल्ली  येथे रेल्वे प्रवासा दरम्यान ड्युटीवर जात असताना मृत्यू झाला होता. चव्हाण यांच्या पश्चात वयस्कर आई, वडील, एक मोठा भाऊ, बहीण, वहिनी पुतणे, पत्नी, एक चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या  कुटूंबीयांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना मदत करावी म्हणून किल्ले पुरंदर सैनिक संघटना, माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर यांच्या वतीने ही मदत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव कुंभारकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभार, धनंजय जगताप, किरण पुरंदरे, संजय कपरे, नवनाथ शिंदे, माजी सरपंच समीर जाधव, उपसरपंच सुशील चव्हाण, जितेंद्र माहूरकर, उमेश वचकल आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नामदेव कुंभारकर म्हणाले की, “एक सैनिक देशासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा कार्यकाळ खर्ची घालत असतो”. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबासाठी त्याला काहीही करता येत नाही. अशातच तरुण वयात सैनिकांचा मृत्यू झाला किंवा वीरगती प्राप्त झाली, तर त्याच्या  कुटूंबाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी अशा सैनिकांच्या  कुटूंबाला सर्वांनी मदत करायला हवी. या दिलेल्या मदती बद्दल चव्हाण  कुटूंबीयांनी आजी-माजी सैनिकांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा