कुस्तीत शानदार शनिवार, भारताला ३ सुवर्ण, रवी-विनेश-नवीनचा जलवा

Commonwealth Games 2022, ७ ऑगस्ट २०२२: २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. या स्पर्धेच्या नवव्या दिवशी कुस्तीमध्ये भारताची शान पाहायला मिळाली. रवी कुमार दहिया, विनेश फोगट आणि नवीन यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर कब्जा केला. याआधी शुक्रवारी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांनीही रसलिंगमध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळविले होते. म्हणजेच कुस्तीत भारताला एकूण सहा सुवर्णपदके मिळाली. नवव्या दिवशी कुस्तीखेरीज भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भाविना पटेलने पॅरा टेबल टेनिसमध्ये सुवर्ण जिंकले.

रवी दहिया सुवर्ण

कुस्तीपटू रवी कुमार दहियाने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता रवी दहियाने अंतिम फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे नायजेरियाच्या ई. विल्सनचा १०-० असा पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी रवी दहियाला तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला.

विनेश-नवीनची चमकदार कामगिरी

कुस्तीपटू विनेश फोगटने नॉर्डिक प्रणाली अंतर्गत आयोजित ५३ किलो वजनी गटातील तिच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेच्या केश्नी मदुरावाल्गेचा ४-० असा पराभव केला. विनेशने आपल्या गटातील तिन्ही सामने जिंकून सुवर्णपदकावर कब्जा केला. केश्नीपूर्वी विनेशने समंथा स्टीवर्ट (कॅनडा) आणि मर्सी अडेकुरोये (नायजेरिया) यांचाही पराभव केला होता. यानंतर नवीनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा ९-० असा पराभव करून कुस्तीमध्ये भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले.

शनिवारी पूजा गेहलोत, दीपक नेहरा आणि पूजा सिहाग यांनीही कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत पूजा गेहलोतने तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफेकचा १२-२ असा पराभव केला. त्याचवेळी पूजा सिहागने ७६ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुयनला पराभूत केले. दीपक नेहराबद्दल सांगायचे तर त्याने ९७ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या तय्यब रझाला पराभूत केले.

लॉन बॉल आणि ऍथलेटिक्समध्येही पदके

लॉन बॉल्सच्या पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत टीम इंडियाने रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत सुनील, नवनीत, चंदन आणि दिनेश यांच्या नेतृत्वाखालील संघाचा उत्तर आयर्लंडकडून पराभव झाला. दुसरीकडे, प्रियांका गोस्वामीने १० किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. प्रियांकाने हे अंतर ४३ मिनिटे ३८.८२ सेकंदात पूर्ण केले. त्याचवेळी अविनाश मुकुंद साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. अविनाश साबळेने हे अंतर 8 मिनिटे ११.२० सेकंदात पूर्ण केले.

बॉक्सिंगमध्ये देखील कमाल

बॉक्सर जास्मिन लांबोरियाला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, म्हणजे तिला आता कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जस्मिनचा इंग्लंडच्या जेम्मा पेग रिचर्डसनने ३-२ असा पराभव केला. दुसरीकडे, बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीनला ५७ किलो वजनी गटात घानाच्या जोसेफ कोमीकडून पराभव पत्करावा लागल्याने केवळ कांस्यपदक मिळवता आले. रात्री उशिरा बॉक्सर रोहित टोकसलाही कांस्यपदक जिंकण्यात यश आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा