ओडिशा, 30 ऑक्टोंबर 2021: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने भारतीय हवाई दल (IAF) च्या भागीदारीत ओडिशाच्या किनारपट्टीवरील प्लॅटफॉर्मवरून स्वदेशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बची (LRB) यशस्वी चाचणी केली आहे. स्वदेशी बनावटीच्या गाईडेड बॉम्बने रेंज व्यापली आणि अचूकपणे लक्ष्य गाठले.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “हवाई दलाच्या लढाऊ विमानातून सोडल्यानंतर, लांब पल्ल्याचा बॉम्ब अचूकपणे लक्ष्यावर उतरला.” बॉम्बला ट्रॅक करण्यासाठी EOTS (इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम), टेलीमेट्री आणि रडार सहित विविध रेंज सेन्सर्स वापरले होते. रेंज सेन्सर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) मध्ये स्थापित करण्यात आले होते.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी म्हणाले की मिशनची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. “LRB च्या यशस्वी चाचणीने या वर्गाच्या प्रणालींच्या स्वदेशी विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे,” असे ते म्हणाले
लांब पल्ल्याच्या बॉम्बची रचना आणि निर्मिती रिसर्च सेंटर इमरात (RCI), हैदराबाद येथील DRDO प्रयोगशाळेने, इतर DRDO प्रयोगशाळांच्या सहकार्याने केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या DRDO, IAF आणि इतर संघांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, लांब पल्ल्याचा मार्गदर्शित बॉम्ब भारतीय सशस्त्र दलांसाठी एक शक्तिशाली शक्ती सिद्ध होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे