ग्रीन फायरवर्कचे पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल. पसंती देऊन ग्राहकांनी केले स्वागत

4

पुणे, १९ ऑक्टोबर २०२२ : दोन वर्षांनंतर दिवाळी जोरदार साजरी होणार असल्याने पुणे शहरात फटाक्यांच्या स्टॉलची संख्याही यंदा वाढली आहे. प्रदूषणमुक्त फटाक्यांना यंदा मोठी मागणी आहे. ‘ग्रीन फायरवर्क’चा शिक्का असलेले अनेक फटाके बाजारात दाखल झाले असून, नागरिकांकडून त्यांची विचारणा होत आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या या फटाक्यांच्या प्रकारांचे उत्पादन यंदा ८० ते ९० टक्क्यांनी वाढले असून, नागरिकांकडूनही या फटाक्यांची मागणी केली जात आहे.

प्रदूषणामुळे फटाक्यांची विक्री घटत असतानाच ग्रीन फायरवर्कचे लेबल असलेली आणि धूर कमी करणारी फुलबाजी, ‘फॅन्सी’ फटाके, भुईनुळे, भुईचक्र बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाली असून, त्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक फटाके जरी बाजारात दाखल झाले असले, तरी यंदा फटाक्यांच्या दरांमध्ये ३० ते ५० टक्क्यांची वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

शहरात फटाक्यांचे अनेक स्टॉल्स लागले असून, रिटेल आणि होलसेल दरामध्ये फटाके विक्री केली जात आहे. दिवाळी सुरू होण्यासाठी आता काही दिवसच उरले असल्याने स्टॉल्सवर गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. सुतळी बॉम्ब, फुलबाजी, भुईनुळे, भुईचक्र, बाण, लवंगी, लक्ष्मी बॉम्ब, उंच उडणारे ‘फॅन्सी’ फटाके यांच्याही किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे.

आजच्या काळात नागरिक अधिक सजग झाले असून कमीत कमी प्रदुषण करून दिवाळी साजरी करण्याकडे त्यांचा कल आहे. फटाक्यांच्या किमती कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे यंदा नागरिकांनाही काहीशा वरच्या दरामध्ये फटाके घ्यावे लागतील. दोन वर्षानंतर फटाक्यांच्या बाजाराने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आता नागरिक चांगली खरेदी करतील, अशी अपेक्षा फटाके विक्रेत्यांना आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा