नाशिक, दि.३० मे २०२०: नाशिक येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये शुक्रवारी ( दि.२९)रोजी महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. तेव्हापासून दिवसभर त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. मात्र हल्ला करून बिबट्या घटनास्थळवरून पळून गेल्याचं वनविभागाच्या निदर्शनास आले होते.
या घटनेला काही तास उलटत नाही, तोच बिबट्याने पून्हा एकदा इंदिरा नगर भागात दोघांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ही घटना साधारण आज ( शनिवार) पहाटे साडेपाच वाजता घडलेली आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात वावरणाऱ्या बिबट्याने आता शहराकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान शुक्रवारी ( दि.२९) रात्री हाच बिबट्या तिडके कॉलनी इथल्या एस एस के हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता मुक्तपणे फिरत असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याच हॉटेल पासून इंदिरानगर साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे.
सध्या संचारबंदी सुरू असल्याने पहाटेच्या सुमारास नागरिक जॉगिंगसाठी बाहेर पडत नाही. ज्या ठिकाणी हल्ला झाला. त्याठिकाणी नागरिक सकाळी बाहेर पडत असतात. मात्र सुदैवाने गर्दी नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
इंदिरानगर परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान बिबट्या दोघांवर हल्ला करून पुढे पळून गेल्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहे. त्याला पकडण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. परिसरात पथकास बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: