रत्नागिरी १४ जानेवारी २०२४ : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेऊन महाविद्यालय आणि शासकीय सामान्य रुग्णालयातील पद भरतीबाबत सविस्तर आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, माजी नगरसेवक सोहेल मुकादम आदी उपस्थित होते.
अधिष्ठाता श्री. रामानंद यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सध्या महाविद्यालयात ३ प्राध्यापक हजर झाले आहेत. शासकीय रुग्णालयात १५ वैद्यकीय अधिकारी हजर होतील. लोकसेवा आयोगाकडूनही प्रक्रिया राबविण्यात येईल.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पदभरतीबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा झाली असून, ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सध्या वर्ग ३, वर्ग ४ पदे बाह्यस्त्रोताकडून शासन निर्णयानुसार तात्काळ भरावीत. त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे. आवश्यक तेथे करार पध्दतीने पदे भरण्याबाबत प्रयत्न करावेत. त्याचबरोबर स्थानिक डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांचीही सेवा, मदत घ्यावी. विशेषतः भूलतज्ज्ञ उपलब्ध करण्याबाबत चर्चा करावी, असेही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर