रत्नागिरी, ५ जानेवारी २०२३ : गुजरात जुनागड येथून भारतीय सागरी हद्दीत मासेमारी करण्यासाठी आलेली ‘रत्नसागर’ नौका रत्नागिरीजवळच्या खोल समुद्रात बुडाली आहे. रत्नागिरी नजिक ९५ नॉटीकल मैल समुद्रात ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील तीन खलाशी समुद्रात बुडाले. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून, एकजण बेपत्ता झाला आहे. तर अन्य चार जणांना वाचण्यास यश आले असून, चारही जणांना तटरक्षक दलाने रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात आणले. दरम्यान, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
गुजरात राज्यतील जुनागड येथील रणछोड केशव थापनिया, कौशिक रणछोड थापनिया यांच्या चार नौका मासेमारीसाठी भारतीय सागरी हद्दीत दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. रत्नागिरी समुद्र किनाऱ्यापासून सुमारे ९५ नॉटीकल मैल आत अंतरावर मंगळवारी रात्री मासेमारी करीत होत्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात नांगर टाकून त्यांनी विश्रांतीसाठी नौका थांबवल्या होत्या. त्यानंतर जेवण उरकून सर्व खलाशी बोटीवरच झोपले.
बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ‘रत्नसागर’ नौकेची एका बाजूची फळी अचानक निखळली. त्यानंतर समुद्राच्या लाटांचा मारा नौकेवर होत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात आतमध्ये घुसले आणि काही क्षणातच बोटीने जलसमाधी घेतली.बचावलेल्या चार खालशांमध्ये जयवंत खरपडे, अंतोल भगत, दीपक वळवी, कल्पेश भंडार यांचा समावेश आहे. लक्ष्मण वळवी आणि सुरेश वळवी या दोन खलाशांचा मृत्यू झाला. तर मधुकर खटाळ हे बेपत्ता आहेत.
ऑपरेशन ‘रत्नसागर’ मध्ये तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मत्स्य विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ.तृप्ती जाधव, प्रशिक्षण अधिकारी जे. डी. सावंत, रोहित सावंत, प्राची सावंत यांच्यासह रत्नागिरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांच्यासह पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी :जमीर खलफे