गुजरात (मोरबी), ३१ ऑक्टोंबर २०२२: गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे मच्छू नदीत बांधलेला केबल-ब्रिज अचानक तुटल्यानं अनेक लोक नदीत पडले. मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील मृतांची संख्या १०० च्या पुढं गेलीय. जखमींची संख्या ७० असल्याचं सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उर्वरित लोकांना नदीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. आताही ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतर हा पूल नुकताच कार्यान्वित करण्यात आला.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली. पूल कोसळल्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली, ज्यात त्यांच्या कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची पाच सदस्यीय समिती नेमण्यात आलीय.
अपघाताच्या वेळी पुलावर मोठी गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे. बचावकार्यात स्थानिक लोकही पोलीस आणि प्रशासनाला मदत करत आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची प्रत्येकी तीन टीम बचाव कार्यात सहभागी आहेत. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन भारतीय वायुसेनेनं (IAF) गरुड कमांडोंची एक टीम पाठवलीय. अनेकांच्या बुडण्याची भीती आहे.
प्रमुख घटामोडी
गुजरातचे सीएम भूपेंद्र पटेल घटनास्थळी पोहोचले.
आयएएफची गरुड कमांडो टीम रवाना झाली.
मोरबी जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केला.
गुजरात सरकारने एसआयटी स्थापन केली.
१० बोटी, आर्मी प्लाटून तैनात
एनडीआरएफच्या दोन तुकड्या पोहोचल्यात. त्यापैकी एक गांधीनगरची तर एक वडोदरा येथील आहे. राजकोटहून एसडीआरएफच्या तीन तुकड्या दाखल झाल्यात. जामनगरहून एसआरपीची एक तुकडी आलीय. सैन्यातील दोन प्लाटून आहेत. एक सुरेंद्र नगर मधील तर एक कच्छ मधील. राजकोट महापालिकेच्या १० बोटी आणि अग्निशमन दलाचं पथकही पोहोचलंय.
हेल्पलाइन क्रमांक जारी
गुजरात सरकारनं या दुर्घटनेच्या चौकशीसाठी ५ जणांची एसआयटी स्थापन केली असून त्यात महापालिकेचा एक आयएएस अधिकारी, एक गुणवत्ता नियंत्रण अभियंता आणि इतर ३ अधिकारी असतील. याशिवाय सीआयडीचं पथकही त्याची चौकशी करणार आहे. ज्यांचे कुटुंबीय अपघातानंतर अडकले आहेत किंवा बेपत्ता आहेत त्यांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षानं ०२८२२ २४३३०० हा हेल्पलाइन क्रमांक जारी केलाय.
५ दिवसांपूर्वी सुरू झाला होता फुल
केबल पूल बराच जुना असल्याचं सांगितले जाते. राजे-महाराजांच्या काळातील हा पूल ऋषिकेशमधील राम-झुला आणि लक्ष्मण झुला पुलांसारखा झुलताना दिसत होता, म्हणून त्याला झुलता-पुल असेही म्हणतात. गुजराती नववर्षाच्या अवघ्या ५ दिवसांपूर्वी नूतनीकरणानंतर हा पूल सुरू करण्यात आला. नूतनीकरणानंतरही एवढ्या मोठ्या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. फिटनेस सर्टिफिकेट न घेताच पुलाचं काम सुरू केल्याचं सांगितलं जातंय. पुलावर फिरायला आलेल्या लोकांना १७ रुपयांचं तिकीट घ्यावे लागत होतं. त्याचवेळी मुलांसाठी १२ रुपयांचं तिकीट बंधनकारक होत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे