पुरंदर : गुळुंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीची २६ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेली ग्रामसभा नियमबाह्य असल्याने ती रद्द करण्याच्या तक्रार अर्जावर पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
पंधरा दिवसात चौकशीवर आदेश देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष अक्षय निगडे व सहकाऱ्यांनी आमरण उपोषण मागे घेतले.
दरम्यान, या चौकशीच्या पत्राने या सभेतील गौडबंगाल पुढे येण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा २७ डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले असतानाही ती एक दिवस अगोदर राजकीय स्वार्थ लक्षात घेऊन घेतली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी करत यांच्यासह १०० ग्रामस्थांनी सभा रद्द करण्याची मागणी पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारवजा केली होती.
या तक्रारींवर कार्यवाही न झाल्याने व्यथित होऊन अक्षय निगडे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही पंचायत समितीकडून काहीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी व्यथित होऊन सोमवार दि.६ रोजी पंचायत समितीपुढे आमरण उपोषणाला सुरुवात केली.
दरम्यान, याच दिवशी आमसभा असल्याने आमदार संजय जगताप यांच्यासह सर्व विभागांचे कर्मचारी व खाते प्रमुख आचार्य अत्रे सभागृहात बैठकीसाठी हजर होते. त्यामुळे एकीकडे आमसभा तर दुसरीकडे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले. याची दखल आमदार संजय जगताप यांनी घेतली असून संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना पारदर्शक कारभार करण्याबाबत सूचना केल्या असल्याचे समजते. दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
गुळुंचे ग्रामपंचायतीकडून बेजबाबदार कारभार सुरू असल्याच्या तक्रारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या.परंतु, पंचायतीची पाठराखण करत बेकायदेशीर कृत्यांना अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले असल्याचा आरोप करत अक्षय निगडे संबंधित विस्तार अधिकारी पी.एम.बगाडे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
दरम्यान, येथील सरकारी गायरान जागेत अतिक्रमण सुरूच आहे. या दोन वर्षात अनेकांनी घरे बांधून सरकारी जागा बळकावली आहे. येथील शाळेच्या जवळील जागेत व्यावसायिक अतिक्रमण सुरूच आहे. याबाबत, विस्तार अधिकारी यांनी येथे येऊन चौकशी केली होती.परंतु, त्याचा अहवालाच त्यांनी तयार केला नाही. ही अतिक्रमणे होण्यास ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा आरोप निगडे यांनी केला आहे. याबाबत पंचायत समिती आता नेमकी काय चौकशी करते. याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, १५ व्या वित्त आयोगात कामांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सभा ही गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची होती. अचानक सभा घेण्याने लोकांना सभेला हजर राहता आले नाही. त्यामुळे मानवी अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
“ग्रामसेवक यांनी २५ डिसेंबर २०१९ रोजी रात्री फोन करून ग्रामसभा २६ डिसेंबर २०१९ रोजी सांगितले. त्यावेळी मी याला विरोध केला व सभेत ठरल्याप्रमाणे २७ डिसेंबर २०१९ रोजी सभा घेण्याबाबत सांगितले. मात्र, ग्रामसेवक यांनी सरपंचांना काम असल्याचे तर सरपंचांनी ग्रामसेवकांना बैठक असल्याने सभेची तारीख अचानक बदलल्याचे सांगितले. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग तसेच सभेत ठरलेल्या तारखेचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. बेकायदा सभा रद्द न झाल्यास हे पुरावे विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे.”
– अक्षय निगडे, तालूका उपाध्यक्ष, रायुकाँ. पुरंदर.