हातचलाखीने एटीएम कार्ड बदलुन ४० हजारांची फसवणूक

बारामती, २९ जानेवारी २०२१:  एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने घेऊन तिच्या खात्यातून ४० हजार रुपये काढुन फसवणूक केल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

याप्रकरणी सुलताना अन्वर सय्यद (रा. पतंगरशहानगर, बारामती) या महिलेने फिर्याद दिली आहे. दि. २५ रोजी स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या भिगवण रस्त्यावरील एटीएम सेंटरमध्ये फिर्यादी महिलेच्या पतीने त्यांच्या खात्यावरून ५१५०० रुपयांची रक्कम अन्य खात्यावर टाकण्यासाठी एटीएम दिले होते. सय्यद सायंकाळी पाचच्या सुमारास एटीएम सेंटरवर गेली. तेथे वाॅचमनच्या गणवेशात एक व्यक्ति उभा होता.

पैसे अन्य खात्यावर वर्ग करत असताना त्याने तुमचे करंटचे अकाऊंट आहे का, अशी विचारणा केली. फिर्यादीने बचत खाते असल्याचे सांगितले. या दरम्यान त्याने मिनी स्टेटमेंट काढण्याचा सल्ला दिला. फिर्यादीच्या हातातील एटीएम घेत हातचलाखीने तिला दुसरेच कार्ड दिले. दुसऱ्या दिवशी खात्यातून चार वेळा सुमारे ३९८२० रुपयांची रक्कम काढल्याचे मेसेज फिर्यादीच्या मोबाईलवर आले. त्यामुळे तिने स्वतःकडील एटीएम कार्ड पाहिले असता त्यावर अशोक तात्याबा काजळे हे नाव असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा