बिहार, २० ऑगस्ट २०२०: सुशांत सिंग प्रकरणावरून सध्या एकमेकांवर टीका करणं हे टोकाला पोहोचलं आहे. राजकीय हेवेदावे नंतर आता पोलीस अधिकारी देखील यामध्ये सामील होताना दिसत आहेत. सुशांत सिंग प्रकरणाबाबत काल सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार सुशांत सिंग प्रकरणाविषयी पुढील तपासणी आता सीबीआय करणार आहे. यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी एक विवादास्पद वक्तव्य केलं होतं. ”बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची रिया चक्रवर्ती हिची लायकी नाही” असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. यानंतर पांडे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होताना दिसले. अखेर याबाबत त्यांना स्पष्टीकरण देणं भाग पडलं आहे.
सुशांत सिंह प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सुशांत सिंह प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा हक्क नाही असं मला म्हणायचं होतं असं सांगितलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
स्पष्टीकरण देताना गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, “लायकीचा अर्थ इंग्लिशमध्ये नैतिक पातळी नाही असा होतो. नितीश कुमार यांच्यासंबंधी वक्तव्य करण्याची रिया चक्रवर्तीची पातळी नाही. सुशांत सिंह प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून आपलं नाव आहे हे रियाने विसरु नये,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.
रिया चक्रवर्तीने मुख्यमंत्र्यांवर असे वक्तव्य करण्याऐवजी तिने कायदेशीर लढा देऊन आपले म्हणणे मांडवे असे सांगत ते म्हणाले की, “जर एखाद्या राजकीय नेत्याने बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. पण जर आरोपी बिहारच्या मुख्यमंत्र्यांसंबंधी निराधार वक्तव्य करत असेल तर हे आक्षेपार्ह आहे. तिने कायदेशीर लढाई लढावी,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी