पुणे २७ जुलै, २०२२: २८ जुलै २०२२ हा यंदाचा अनोखा गुरुपुष्यामृताचा योग आहे. या दिवशी दिप अमावस्या असूनही या दिवशी पुष्य नक्षत्र असल्याने हा दिवस महत्वपूर्ण मानला जात आहे. पण त्यासाठी आधी गुरुपुष्यामृत म्हणजे काय हे माहित करुन घेऊया.
पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा होय. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते. हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते, तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत असे म्हणतात. या नक्षत्राचे शुभ चिन्ह आहे गायीचे स्तन. ज्याप्रमाणे गाईचे दूध हे अमृततुल्य मानले जाते, त्याप्रमाणे पुष्य नक्षत्रातून निघणा-या तीन तारका संपूर्ण विश्वाला संपन्न करतात. या गुरुपुष्यामृताच्या दिवशी जप केल्याने त्याचे उत्तम फळ मिळते. या दिवशी सुवर्ण खरेदी केल्याने सोन्यात वृद्धी होते, असं म्हणतात.
यंदा २८ जुलैलाच दिप अमावस्या आली आहे. पण दीप अमावस्या म्हणजे काय हे, जाणून घेऊया. आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. दिव्यांच्या प्रकाशामुळे घर आणि जग उजळून निघू दे, आणि अंधार नष्ट होऊ दे, हा यामागचा उद्देश.
या दिवशी दिव्यांना स्वच्छ घासून त्यांना एका ताटात गोळा केले जाते. त्यांच्यामध्ये तूपाची वात लावून ते देवापुढे ठेवतात. त्यांना फुलं वाहून पुरणाचा नैवेद्य दाखवतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते, असे मानले जाते. या दिवसानंतर अंधकार निघून आनंदात निघून जावो, हा यामागचा उद्देश.
२८ जुलै, २०२२ अनोखा योग असल्यामुळे सोन्याप्रमाणे उजळून आणि दिव्याप्रमाणे प्रकाशमान होण्याचे सौभाग्या तुम्हाला मिळो.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस