ठाणे, ६ ऑगस्ट २०२०: सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस महाराष्ट्रात बंदी असताना देखील बेकायदेशीर पद्धतीने ठाण्यात याची विक्री सुरू आहे. गुजरातमधून अवैध्य पद्धतीने आणला जाणारा गुटखा हा अन्न सुरक्षा पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे पकडला. त्यानी भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील २८० गोण्यात असलेला ६५ लाख ७८ हजार रुपये किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा हा ताब्यात घेतला आहे. एवढेच नव्हे तर ज्या ट्रकमध्ये हे अवैध सामान होते त्या ३६ लाख रुपयांच्या तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे.
या दरम्यान ट्रक चालक मोहम्मद आदिल व उदल यादव या दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र तिसरा ट्रक चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. या तिन्ही ट्रक मधून ६५ लाख ७८ हजार रुपयांचा गुटखा व ३६ लाख रुपयांचे तीन ट्रक असा एकूण १ कोटी १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्या विरोधात भादवी कलम २७२, २७३, १८८, ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ५९ अंतर्गत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे व कोकण विभाग सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा निरीक्षक माणिक जाधव, एस एम वधारकर, एम एम सानप, ए डी खडके या पथकाने प्राथमिक माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे