हडपसर पुन्हा हादरले, जुन्या वादातून एकाचा खून

हडपसर, दि. २३ मे २०२०: हडपसर येथे दि.२२ मे रोजी मध्यरात्री तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आहे. हडपसर परिसरात वर्चस्व वादातून गुन्हेगारी वाढत चालली आहे.

शोएब मजीद शेख (वय १९) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान यातील आरोपी व शोएब एकाच परिसरातील आहेत. त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. शोएब याने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरूच होते.

दरम्यान मध्यरात्री शोएब भेकराईनगर मध्ये असताना तिघांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. हा प्रकार समोर येताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीत शोध मोहीम राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान शोएब हा सरकार राज नावाचा ग्रुप चालवत होता. तो त्या ग्रुपचा प्रमुख देखील होता.

हडपसर परिसरात वर्चस्व व टोळ्यांची गुन्हेगारी वाढत चालली आहे. या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात हडपसर पोलीस अपयशी ठरले आहेत. गेल्या काही दिवसांत हडपसर उपनगरात अवैध व्यवसाय, गटबाजी व त्यातून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबद्दल हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे व पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा