श्रीलंकेत हाहाकार, हिरवी मिरची 700 रुपये किलो, बटाटे 200 रुपये किलो

श्रीलंका, 13 जानेवारी 2022: भारताचा शेजारी देश श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने जनतेचं कंबरडे मोडलं आहे. श्रीलंकेच्या अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटने चलनवाढीचा डेटा जारी केला आहे, ज्यामध्ये एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढीचे सर्वात मोठं कारण म्हणजे भाज्यांच्या दरात झालेली प्रचंड वाढ असल्याचं सांगितलं जात आहे.

अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटचा बाथ करी इंडिकेटर (BCI) देशातील किरकोळ वस्तूंच्या चलनवाढीचा डेटा प्रसिद्ध करतो. नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान खाद्यपदार्थांच्या महागाईत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल BCI ने दिलाय.
भाज्यांचे वाढलेले भाव हे त्याचं प्रमुख कारण आहे. श्रीलंकेत 100 ग्रॅम मिरचीची किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेलाय. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात 287 टक्क्यांनी वाढ झालीय.

त्याचप्रमाणं वांग्याच्या दरात 51 टक्के, लाल कांद्यामध्ये 40 टक्के आणि सोयाबीन, टोमॅटोच्या दरात 10 टक्के वाढ झाली आहे. एक किलो बटाट्यासाठी लोकांना 200 रुपये मोजावे लागतात. श्रीलंकेत आयात न झाल्यामुळं दुधाच्या भुकटीचाही तुटवडा निर्माण झाला.

इतर भाज्यांचे भाव-

टोमॅटो – 200 रु./किलो
वांगी – रु 160/किलो
भिंडी – रु 200/किलो
कारलं – रु 160/किलो
बीन्स- 320 रुपये/किलो
कोबी – 240 रुपये/किलो
गाजर – रु 200/किलो
कच्ची केळी – रु 120/किलो

एकंदरीत, 2019 पासून किमती जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत आणि डिसेंबर 2020 च्या तुलनेत 37 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा अर्थ असा की, डिसेंबर 2020 मध्ये खाद्यपदार्थांवर दर आठवड्याला 1165 रुपये खर्च करणारे चौघांचे सरासरी कुटुंब आता त्याच वस्तूसाठी 1593 रुपये मोजत आहे.

वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्य जनता हैराण झाली असून लोकांना पोटभर अन्नही मिळत नाही. अनुरुद्ध परंगमा या टॅक्सी चालकाने ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्राला सांगितलं की, त्यांचे कुटुंब आता दिवसातून तीन ऐवजी दोन वेळाच जेवू शकत आहे.

तो म्हणाला, ‘माझ्यासाठी कारचे कर्ज फेडणे खूप कठीण आहे. वीज, पाणी, अन्न या खर्चानंतर कारचे कर्ज फेडण्यासाठी काहीच उरलं नाही. माझ्या कुटुंबाला तीन वेळेऐवजी फक्त दोनवेळाच जेवण घेता येते.

अन्नधान्याच्या वाढत्या किमती पाहता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केलीय. या अंतर्गत सरकारने ठरवलेल्या किमतीत सर्वसामान्यांना खाण्यापिण्याचे अधिकार मिळावेत, असे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत.

श्रीलंकेच्या दुरवस्थेची अनेक कारणे आहेत, ज्यात कोविड महामारी, वाढता सरकारी खर्च आणि चालू कर कपात यांचा समावेश आहे. कोविडने श्रीलंकेचा पर्यटन उद्योग जवळपास उद्ध्वस्त केलाय. सरकारी तिजोरी रिकामी आहे आणि श्रीलंकेवर विदेशी कर्जाचा बोजाही वाढत आहे.

जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या सुरुवातीपासून श्रीलंकेतील पाच लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थ 22.1 टक्क्यांनी महागले आहेत.
अशा स्थितीत श्रीलंकेला दिवाळखोर घोषित केलं तर नवल नाही. श्रीलंकेचे विरोधी खासदार आणि अर्थतज्ज्ञ हर्ष डी सिल्वा यांनीही याबाबत भीती व्यक्त केलीय. श्रीलंकेची परकीय चलनाची गंगाजळी रिकामी असून कर्ज वाढत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितलं. अशा स्थितीत श्रीलंका पूर्णपणे दिवाळखोर होईल.

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर वा विजेवर्देना यांनीही म्हटलंय की, श्रीलंकेला डिफॉल्ट होण्याचा पूर्ण धोका आहे आणि असे झाल्यास त्याचे खूप वाईट परिणाम होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा