अनवाणी पायाने पद्मश्री स्वीकारलेला साहित्यकार

Padma Shri winner from Odisha
अनवाणी पायाने पद्मश्री स्वीकारलेला साहित्यकार

Padma Shri winner from Odisha: जीवनात आपण अनेक लोकांना भेटतो. काही जण जन्मतःच सुख-सुविधांनी परिपूर्ण आयुष्य जगतात, तर काहींना गरिबी आणि संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण काही व्यक्ती अशी असतात, जी अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कर्तृत्वाने जग जिंकतात. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे हलधर नाग, ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील एक साधा माणूस, ज्यांनी अत्यंत कमी शिक्षण घेऊनही आपल्या साहित्यिक योगदानाने देशभरात नाव कमावले आणि २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले.

बालपण आणि संघर्ष

हलधर नाग यांचा जन्म 1950 मध्ये ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत खडतर होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी आई-वडिलांना गमावले त्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, तिसरीत शिकत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी धाब्यावर देखील काम केले. त्यानंतर गावातील एका सरपंचाच्या मदतीने त्यांना स्थानिक शाळेत स्वयंपाक्याचे काम मिळाले, जे त्यांनी 16 वर्षे केले. या काळात त्यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सर्वांची मने जिंकली.

छोट्या दुकानाची सुरुवात

काही वर्षांनंतर हलधर यांनी बँकेकडून १००० रुपयांचे कर्ज घेऊन शाळेजवळ एक छोटेसे स्टेशनरीचे दुकान सुरू केले. शिक्षण कमी असले तरी त्यांच्या मनातील साहित्याची ज्योत कधी विझली नाही. त्यांनी आपल्या रोजच्या आयुष्यातून वेळ काढून छोट्या-छोट्या साहित्यकृती लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या लेखनातून त्यांचे साधेपण आणि खोल विचार डोकावू लागले.

‘रागा चना’ विक्रेता आणि साहित्यिक.

आज वयाच्या ७५ व्या वर्षीही हलधर नाग बारगढमधील रथयात्रेदरम्यान ‘रागा चना’ (मसालेदार चणे) विकतात. विशेष म्हणजे, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर ही त्यांनी आपला हा व्यवसाय सोडला नाही. “हा माझा व्यवसाय आहे, यातूनच मी माझा उदरनिर्वाह करतो,” असे ते अजूनही अभिमानाने सांगतात. त्यांच्या या साधेपणामुळे आणि मेहनतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो.

पद्मश्री पुरस्कार आणि साधेपणा

२०१६ मध्ये भारत सरकारने हलधर नाग यांच्या कोसली भाषेतील साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. विशेष बाब म्हणजे, त्यांच्यावर पाच पीएच.डी. प्रबंध लिहिले गेले आहेत, ही त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाची खरी पावती आहे.पण त्यांचा साधेपणा यातूनही दिसून येतो जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्याचा फोन आला, तेव्हा त्यांनी विनम्रपणे सांगितले, “साहेब, माझ्याकडे दिल्लीला येण्यासाठी पैसे नाहीत, कृपया पुरस्कार टपालीने पाठवा.”

पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले, तेव्हा त्यांनी साधी पांढरी धोती आणि बनियान घालून, अनवाणी पायाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला. त्यांचा हा साधेपणा उपस्थित सर्वांना भावला. आणखी एका प्रसंगात त्यांनी पुरस्कारासोबत मिळालेली १०,००० रुपयांची रक्कम अनाथाश्रमाला दान केली, ज्यामुळे त्यांच्या उदार आणि निस्वार्थी स्वभावाची झलक दिसून आली.

साहित्य आणि प्रेरणा

हलधर नाग यांनी कोसली भाषेत अनेक कविता आणि लोकसाहित्य रचले, त्यांच्या साहित्यातून ग्रामीण जीवन, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये सुंदरपणे उलगडतात. त्यांचे साहित्य इतके प्रभावी आहे की, अनेक विद्वानांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास केला आणि त्यांच्यावर संशोधन केले.शिक्षणाचा अभाव असूनही त्यांनी आपल्या लेखनाने साहित्यविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांचे जीवन ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीचे जिवंत उदाहरण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, जुई काळे