गोल पोस्ट राजकारण हर्षवर्धन जाधव यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप

हर्षवर्धन जाधव यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप

औरंगाबाद, दि.३० मे २०२०: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. त्यासंदर्भात जाधव यांनी १९ मिनिटांचा एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे की, रावसाहेब दानवे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा, मला पुन्हा त्रास दिला तर मी जीव देईन , आणि तुम्हाला अडचणीत आणेन . अशी धमकीही जाधव यांनी दानवे यांना दिली आहे.

जाधव पुढे म्हणतात की, आमचे वैवाहिक संबंध आजपर्यंत चांगले झालेले नाहीत. त्याचा खूप त्रास झाला. मी आजपर्यंत अनेक निवडणुका स्वतःच्या हिमतीवर लढलो. जिंकलोही. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझा बंगला, जमीन विकली. तुम्ही कधीही मदत केली नाही. मात्र अनेकदा तुम्ही मला अडथळा निर्माण करून त्रास देण्याचा प्रयत्न केला.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. मागील आठवड्यातच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. व आपला उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांची निवड केली होती. त्यांचा कौटुंबिक वाद असल्याचे जाधव यांनी व्हिडीओद्वारे मान्य केले आहे. तसेच मी संजनाच्या मागे खंबीरपणे उभा आहे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version