हर्सूल रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला प्रारंभ; चार दिवस वाहतुकीत बद्दल

औरंगाबाद, १३ फेब्रुवारी २०२३ : हर्सूल गावातील मुख्य रस्त्याचं रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ९८ मालमत्तांच्या भूसंपादनाच्या कामाला सोमवारपासून (ता. १३) सुरवात करण्यात आली आहे. या बाधित रस्त्यात येणारी अतिक्रमणे काही नागरिकांनी स्वतःहून काढली आहेत. पुढील चार दिवस भूसंपादनाचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे ता. १३ ते ता. १६ पर्यंत हर्सूल-सावंगी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तब्बल अडीच दशकांनंतर हा मार्ग मोकळा होणार आहे. पोलिस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणत बंदोबस्त होता. या रस्त्याचे पूर्वी वर्ष २००८ आणि २०१२ मध्ये महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया केली होती; मात्र भूसंपादनाचा मोबदला द्यायचा कोणी? यावर निर्णय न झाल्याने रुंदीकरणाचे काम रखडले होते; मात्र अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वर्ष २०१७ मध्ये हर्सूल ते फदार्पूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘७५३-एफ’च्या कामाला सुरवात केल्याने व या मार्गावरील सर्व मालमत्तांच्या भूसंपादनाची जबाबदारी घेतल्याने या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे.

नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करावा :
औरंगाबाद शहरातून हर्सूल गावातून फुलंब्री, सिल्लोडकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी-पॉइंटवरून वळवून आंबेडकरनगर चौक, पिसादेवी बायपासमार्गे पुढे जाईल. तर फुलंब्री, सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी वाहतूक सावंगी नाका येथून सावंगी बायपासमार्गे नारेगाव, वोक्हार्ट, टी-पॉइंटमार्गे अशी वळविली आहे, असेही पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा