हाथरस नंतर उत्तर प्रदेशमधील चित्रकूट मध्ये दलित मुलीवर बलात्कार, पीडितेची आत्महत्या

चित्रकूट (उत्तर प्रदेश), १४ ऑक्टोबर २०२०: हाथरसनंतर उत्तर प्रदेश मधील चित्रकूटमध्ये एका सामूहिक बलात्कार पीडितेला या जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. सामूहिक बलात्कारानंतर १५ वर्षांच्या दलित मुलीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एफआयआर नोंद न केल्यामुळे मुलगी अस्वस्थ झाली होती आणि त्यामुळेच तिने आत्महत्या करत आपले प्राण गमावले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटूंबाच्या आरोपानंतर या प्रकरणातसुद्धा जोर धरला जात आहे. नेते गावात जाऊ लागले आहेत. आज पीडितेचे अंत्यसंस्कार आहे, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने संबंधित गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप दिलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

चित्रकूटचे एसपी अंकित मित्तल यांच्या हवाल्याने पीटीआयने सांगितले की, मंगळवारी (१३ ऑक्टोबर) माणिकपूर भागात १५ वर्षाच्या मुलीने आपल्या घरात गळफास लावून घेतला. एसपी म्हणाले की, मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे अशी तक्रार केली आहे की, ८ ऑक्टोबर रोजी जंगलात तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

तिन्ही आरोपींना अटक

एसपी अंकित मित्तल यांनी सांगितले की पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किशन उपाध्याय, आशिष आणि सतीश या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी किशन उपाध्याय हा गाव प्रमुखांचा मुलगा आहे. पॉक्सो अ‍ॅक्ट आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मात्र, तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने पीडितेने आपले जीवन संपवले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बलात्कारानंतर आरोपी मुलीचे हातपाय बांधून फरार झाला आणि पोलिसांनी तिला घरी आणले पण एफआयआर नोंदविला नाही, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे नेतेही गावात जाऊ लागले आहेत. नेत्यांव्यतिरिक्त दलित संघटनांचे लोकही गावात पोहोचत आहेत. ज्यामुळे तेथे खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा