उत्तर प्रदेशात मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक; २४ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, दि.१६ मे २०२०: उत्तर प्रदेशमधील औरय्या येथे आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास गावी जाणाऱ्या मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात  २४ जणांचा मृत्यू झाला असून ३५जण गंभीर जखमी झाल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रकमधील सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते, अशी माहिती समोर येत आहे.

देशांत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो मजूर देशाच्या विविध भागात अडकून पडले आहेत. मिळेल त्या वाहनाने हे मजूर आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ स्थलांतरीत मजुरांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. त्यानंतर मध्यप्रदेशात गुना तर उत्तरप्रदेशात जालोन जिल्ह्यात अपघात झाला होता. आता त्या पाठोपाठ हा भीषण अपघात झाल्याने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा