पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यू, मलेरियाला ब्रेक! महापालिकेची धडक मोहीम, २२ लाखांचा दंड वसूल

PCMC Crackdown on Dengue and Malaria
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यू, मलेरियाला ब्रेक!

PCMC Crackdown on Dengue and Malaria: डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेमुळे शहरात या आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश येत आहे. या मोहिमेंतर्गत घराघरांत तपासणी, जनजागृती आणि दंडात्मक कारवाईचा तिहेरी कार्यक्रम राबवला जात आहे.

महापालिकेने आतापर्यंत ५ लाख ४३ हजार ७६६ घरे, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनर, १ हजार २३८ भंगार दुकाने आणि १ हजार ६०९ बांधकाम स्थळांची कसून तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या ३ हजार ४३१ ठिकाणी महापालिकेने तातडीने नोटीस बजावली आहे. याशिवाय, ६२४ नागरिक आणि आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल २२ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “महापालिकेकडून डेंग्यू, मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी, तपासण्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.” तर उपायुक्त सचिन पवार यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांचा प्रभागनिहाय आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी देखील आपले घर व परिसरात स्वच्छता राखावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.”

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या या अथक प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवडकरांना डेंग्यू आणि मलेरियापासून दिलासा मिळण्याची आशा आहे. नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या घराभोवती स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे