राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, किमान तापमानातही वाढ; रसवंतिगृह, शीतपेयांच्या दुकानांत होतेय गर्दी

पुणे, १ मार्च २०२३ : कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यात उन्हाचा चटका सातत्याने वाढत आहे. तर किमान तापमानातही वाढ होत आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ३७ अंशांपर्यंत तापमान जाऊन पोचले आहे. यामुळे आता नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील मंगळवारचे (ता. २८ फेब्रुवारी) किमान-कमाल तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये खालीलप्रमाणे :
१) मुंबई (कुलाबा) : २४-२८
२) ठाणे : २४-२९
३) नाशिक : २२-२८
४) पुणे : २१-२६
५) औरंगाबाद : २०-२५
६) नांदेड : २१-२८
७) नागपूर : २४-३३
८) चंद्रपूर : २३-३२
९) रत्नागिरी : २५-३०
१०) सातारा : २२-२९
११) कोल्हापूर : २२-३०
१२) सोलापूर : २१-२९

दरम्यान, उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी रस्त्यावरील रसवंतिगृह व शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. रसवंतिगृह चालकही या हंगामी धंद्यासाठी सरसावले असून, ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रवासात उन्हाने जिवाची काहिली होत असल्याने प्रवासी आपोआपच रसवंतिगृहांचा व शीतपेयांचा आश्रय घेताना दिसत आहेत. उसाच्या थंडगार ताज्या रसाला अधिक पसंती दिली जात असल्याने रसवंतिगृहे फुलून गेली आहेत.

रसवंतिगृह चालकांचा हा हंगामी व्यवसाय असल्याने ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी रसवंतिगृह चालक विविध सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही रसवंतिगृह चालकांनी ग्राहकांसाठी टेबल-खुर्च्यांसोबतच लहान मुलांसाठी झोके, खेळणी आदी वस्तू ठेवल्या आहेत. वाढत्या महागाईसोबतच यंदा उसाचा ताजा रसही १० ऐवजी१५ रुपयांना विकला जात आहे. शहर परिसरात तर हा दर २० रुपये आहे. गारव्यासाठी काही ठिकाणी बर्फाचा वापर टाळून थेट डिपफ्रीजमध्ये थंड केलेल्या उसाचा ताजा रस दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे बर्फाची अ‍ॅलर्जी असलेले प्रवासी थेट हा थंडगार रस पिण्याला पसंती देताना दिसत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा