कोल्हापूर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग; आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे, १४ जानेवारी २०२३ : कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील सिराफ्लक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Ceraflux India Pvt. Ltd.) या कंपनीला शनिवारी (ता. १४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण आहे, की संपूर्ण कंपनीला या आगीने गिळंकृत केल्याचे दृश्य आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, की कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सिराफ्लक्स युनिटमध्ये भीषण आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते.

केमिकल कंपनी असल्याने नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे; तसेच इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठीही काळजी घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा