पुणे, दि. ३ जून २०२०: निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मुंबईबरोबरच पुणे शहराला देखील बसणार असे पुणे हवामान खात्याने वर्तवले होते. पुण्यात ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असे देखील हवामान खात्याने सांगितले होते त्यानुसार आज पुण्यामध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे तसेच जोरदार वारे देखील वाहत आहेत.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र आज दिवसभर पाऊस सातत्याने सुरू आहे. त्याचबरोबर सोसाट्याचे वारे असल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी याचा परिणाम देखील दिसून आला आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील एका घरावर मोठे झाड पडल्यामुळे घराचे देखील नुकसान झाले आहे. औंध परिसरातील सर्जा हॉटेल समोर देखील झाड पडल्याची घटना समोर आली होती. प्रशासनाने त्वरित हे पडलेले झाड हटविले. वडगाव शेरी भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक घरे अर्ध्या पाण्यात बुडाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते.
पहिल्याच पावसामुळे सोलापूर रस्ता, ससाणेनगर रस्ता, रवीदर्शन सोसायटी चौक, डि मार्ट रस्ता, माळवाडी, वानवडी येथील फातिमानगर चौक, कै. विठठलराव शिवरकर रस्ता आदी रस्त्यांवर प्रचंड पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना अक्षरशः रस्ते शोधावे लागत होते .
न्यूज अनकट प्रतिनिधी