पुणे, दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ : राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. काल सोमवारी पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठल्यामुळे गाड्या वाहून गेल्या. तर पुण्याच्या मध्यभागी असलेल्या दगडूशेठ हलवाई मंदिरात पाणी शिरले होते. परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा पुणे शहरालादेखील फटका बसला आहे.
सोमवारी रात्री फर्ग्युसन रस्ता, एरंडवना परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साठले होते. त्याच बरोबर नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ सोमवार पेठ, नाना पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर येरवडा, वडगाव शेरी या उपनगरात जोरदार पाऊस झाला. तर बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. पुणे शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आले होते.
सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गासह नागरिकांचे यामुळे अतोनात हाल झाले. जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदाआनंदनगरमधून साचलेल्या पाण्यातून बारा जणांची सुटका करण्यात आली. दरम्यान, पुण्यात आज आणि उद्याही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर