पुणे, १९ ऑक्टोबर २०२०: गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पण, आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिनांक २१, २२ आणि २३ ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आज पुण्यामध्ये कडाक्याचे ऊन असलं तरीही काल पुण्यातील हवेली तालुक्यात रात्री मुसळधार पाउस झाला होता. केवळ एक ते दोन तास पडलेल्या या पावसामुळे हवेलीत पूरजन्यस्थिती निर्माण झाली होती. ढगफुटी समान पडलेल्या या कालच्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यात आता हवामान खात्याने पुन्हा पुण्यात पुढील चार दिवसात ढगांच्या गडगडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवांधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तेथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील २४ तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सोमवारपासून या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून त्यानंतर ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे