मुंबई, १२ जून २०२३: अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, धुळीचे वादळ आणि समुद्रात उंच लाटा उसळल्या. चक्रीवादळामुळे अनेक उड्डाणेही प्रभावित झाली आहेत. हवामान खात्याने महाराष्ट्राला आधीच अलर्टवर ठेवले आहे. हे चक्रीवादळ आता देवभूमी द्वारकापासून ३८९ किमी अंतरावर आहे आणि १५ जूनपर्यंत गुजरातच्या जाखाऊ बंदरात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी १ वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
चक्रीवादळाबाबत भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यावेळी मुंबईत वादळ आले आणि अनेक झाडे उन्मळून पडली. सध्या चक्रीवादळ बिपोरजॉय ताशी ९ किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे.
चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावरील विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मोठ्या संख्येने प्रवासी त्यांच्या विमानाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. रविवारी संध्याकाळी मुंबईतील अनेक विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले. एअर इंडियाने या संदर्भात अधिसूचना जारी करून काही फ्लाइट्सच्या विलंबाबाबत सांगितले.
चक्रीवादळामुळे मुंबईतील मरीन ड्राइव्हवर उंच लाटा उसळल्या होत्या. आयएमडी च्या म्हणण्यानुसार, ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे धुळीचे वादळ मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह विध्वंस करू शकते. गेल्या दोन दिवसांपासून चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात दिसून येत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड