मुंबई,४ ऑगस्ट २०२०:ठाणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास सोमवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. संथ गतीने सुरू असलेला पाऊस हा काल पासून धो धो पडत आहे त्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी पाहायला मिळत आहे .
हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी पुढचे ४८ तास हे रेड अलर्ट म्हणून घोषित केले आहेत . म्हणजेच पुढील दोन दिवस आता ठाणेसह मुंबईत मुसळधार पावसाने मुक्काम ठोकला आहे . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीच्या कोकण भागावर व मुंबई, ठाणे या क्षेत्रात होताना दिसत आहे. त्यामुळे मुसळधार पावसाबरोबरच काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .
मुसळधार पावसाचे पडसाद हे मीरा – भाईंदर परिसरात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. मुसळधार पावसाने मीरा-भाईंदर पाण्याखाली गेले आहे. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले आहे . मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली.
मुसळधार पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचे लोंढे वाहून येत होते. मुसळधार पावसामुळे तब्बल ४० झाडे पडली आहेत . सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. तर मुंबईच्या हिंदमाता परिसरात देखील पाणी साचल्याने नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे .
न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे