छत्रपती संभाजीनगर,६ जुलै २०२३ : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात काल बुधवारी दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावली. पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूरसह सोयगाव तालुक्यात बुधवारी पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पुर आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांना मोठा फायदा होणार आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी परिसरात एक तास दमदार पावसाने हजेरी लावली. महसूल विभागाकडे ३० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. बुधवारी येथील आठवडी बाजार असल्याने व्यापारी व ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली. या पावसामुळे आता रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. तर मुरूमखेडा परिसरातही बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुरूमखेडा गावच्या नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला आहे.
फुलंब्री तालुक्यातील आळंद व परिसरात गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तासभर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिप पिकांना जीवदान मिळाले आहे. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. आठ दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पण दमदार पाऊस होत नसल्याने ही पिके धोक्यात आली होती. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचले होते, तर गावातील रस्त्यांवरही पाणीच पाणी होते. मात्र पिकांना गरज असताना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.वैजापूर तालुक्यात दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पुर आले होते. आतापर्यंत तालुक्यात, बोरसर मंडळात सर्वाधिक १४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर