देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याने काही राज्यांमध्ये जारी केला ‘अलर्ट’

पुणे, ७ जुलै २०२३ : काल गुरुवारी देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने काही राज्यांमध्ये ‘रेड’, ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केले, तर गोव्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. राष्ट्रीय राजधानीत सकाळी मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीतील नऊ ठिकाणी पाणी साचले आहे, ज्यात बापरोला येथील जय विहार, आझाद मार्केट, पालममधील साध नगर, शाहपूर जाट, अशोक विहारमधील निमरी कॉलनी, न्यू राजिंदर नगर आणि सीलमपूरमधील कांती ही ठिकाणे आहेत. दिल्ली महानगरपालिकेने शेअर केलेल्या माहितीनुसार नगर पूर्व सारख्या भागांचाही यात समावेश आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या भागात पाणी साचले होते. वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रगती मैदान, मोदी मिल्स फ्लायओव्हर, एमबी रोडच्या दोन्ही बाजू, राणी झांसी रोड या भागात पाणी साचले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(बीएमसी) पावसाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला आणि दादर, माहीम, खार, माटुंगा आणि कुर्ला यांसारख्या काही भागात गेल्या १२ तासांत ४० मिमी ते ७० मिमी पाऊस झाला. बीएमसी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आयएमडी च्या मुंबई केंद्राने त्यांच्या ‘जिल्हा अंदाज आणि चेतावणी’ मध्ये रविवारी संध्याकाळी शहरासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, गोव्यात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाली. त्यामुळे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर राज्यातील किनारपट्टीच्या सखल भागात अनेक घरे पाण्याखाली गेली.

केरळमधील पावसाच्या थोड्याशा विश्रांतीनंतर, गुरुवारी
राज्यात पावसाचा जोर वाढला, ज्यामुळे दोन जिल्ह्यांमध्ये ‘रेड’ अलर्ट देण्यात आला तिथेे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयएमडीने कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांमध्ये ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे, तर राज्यातील इतर सात जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. केरळच्या अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आणि अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अनेक झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झालेल्या घरांमध्ये राहणारे शेकडो लोक बेघर झाले आहेत. नदीतील वाढत्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा