बारामती , १७ ऑक्टोबर २०२० : बारामती राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नीरा नदीला महापूर आल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.परिसरातील शेतात पाणी शिरल्याने विजपुरवठा खंडित झाला आहे.शुक्रवारी ( दि.१६ ) रोजी वीर धरणामधून नीरा नदीत वेगाने विसर्ग सोडला होता. त्यानंतर वीर धरणाच्या सांडव्यातून संध्याकाळी सात वाजता २३ हजार १८५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता. गुरुवारी (दि.१५) रोजी पहाटेच्या दरम्यान ५३ हजार ८४७ क्युसेकस वेगाने विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगवी ( ता. बारामती ) येथील नीरा नदी वरील पुलावरून पहाटे पाणी प्रचंड वेगात वाहू लागले.
पावसाच्या मुसळधार सरी बरसल्याने शेजारील गावात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरात व शेतात शिरले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वाड्या वस्त्यांवरून जाणारे ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे वाड्या वस्त्याचा संपर्क तुटला आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. यामुळे नदीच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारामती फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील वळणावरील रस्ता पूर्णपणे खचला आहे. यामुळे वाहने माघारी फिरत असून हजारो लोकांचा संपर्क तुटला आहे. पाहुणेवाडी येथे असणाऱ्या ओढ्यावरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. यामुळे सर्व वाहतूक माळेगाव मार्गे वळवण्यात आली आहे.
दरवर्षी या पुलासाठी शासनाचे लाखो रूपये पाण्यात जात आहेत. यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव