लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान, मंत्री संजय बनसोडे शेतकऱ्यांच्या बांधावर, मदतीचे वाटप

10

लातूर, ३१ जुलै २०२३ : गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईसह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. सलग पडलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले होते. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद पडली होती. जनजीवन विस्कळीत झाले होते.१५ दिवस पडलेल्या मुसळधार पासने शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लातूर जिल्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री संजय बनसोडे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले.

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जोरदार पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. प्रशासनाने पंचनामा केलेल्या ७८० शेतकऱ्यांच्या तीनशे हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी मंत्री संजय बनसोडे म्हणाले अद्याप पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्यामुळे आपण आशावादी आहोत. भविष्यात लातूर शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी लातूरला कसे आणता येईल याबाबत आपण अभ्यास करून पाठपुरावा करणार आहे. लातूरची तहान भागविण्यासाठी गरजेच्या असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याविषयी अधिवेशन संपल्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत एक बैठकही लातूरला घेणार आहे. या बैठकीत जल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे संजय बनसोडे यांनी लातूर येथे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर