जम्मू-काश्मीर, २० ऑक्टोबर २०२२ : पूंछ आणि राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यांना दक्षिण काश्मीरमधील शोपियानशी जोडणारा मुघल रस्ता गुरुवारी जम्मूच्या उंच भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून डोडा, किश्तवाड, राजौरी, रियासी, पुंछ, रामबन आणि कठुआ जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार बर्फवृष्टी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “मुघल रोडवर प्रचंड बर्फवृष्टीमुळे/वाहतूक बंद करण्यात आली आहे,” असे पोलीस उपअधीक्षकांनी पीटीआयला सांगितले. यापूर्वी १८ ऑक्टोबर रोजीही बर्फवृष्टीमुळे दिवसभर रस्ता बंद करण्यात आला होता आणि बुधवारी वाहतूक बंद झाल्याने तेथे अडकलेल्या सुमारे १०० प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते.
पाऊस आणि बर्फाचा अंदाज…..
श्रीनगरच्या हवामान केंद्राने १९-२० ऑक्टोबर दरम्यान जम्मू-काश्मीरच्या काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी दुपारी खोऱ्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. येथील दिवसाचे तापमान २३.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. काश्मीरच्या डोंगराळ भागात हलकी बर्फवृष्टी झाली.
अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या
हिवाळ्यात बर्फवृष्टीदरम्यान येणाऱ्या समस्या लक्षात घेता प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बर्फवृष्टीपूर्वी लोकांना रेशन आणि इतर सुविधा देण्याचे निर्देश आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जसजसा हिवाळा वाढत जातो तसतसे उंच पर्वतीय भागातही जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे इतर समस्या निर्माण होतात. त्यादृष्टीने अगोदरच तयारी करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड