बारामती, १५ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरात आज सकाळपासून पावसाची संततधार सूरु होती पण संध्याकाळी चार वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. बारामती शहराला पावसाच्या पाण्याने वेढा दिल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की सगळे रस्ते पाणी पाणी झाले आहेत.
बारामती शहरात आज पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे आज शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा वेग प्रचंड असल्याने भिगवण रोडला नदीचे स्वरूप आले होते. पेन्सिल चौकाकडून पाण्याचा वेग प्रचंड होता. भिगवण रोडलगत असणाऱ्या एकता नगर, लाईट बोर्ड वसाहत, कांचन नगर, वडुजकार इस्टेट मधील रहिवाशी वस्तीमध्ये पाणी साचले होते. तर अपार्टमेंटचे पार्किंग पाण्याखाली गेले आहे.
यामध्ये अनेक चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. तर शहरातील आमराई, सटवाजी नगर, साठे नगर मधील घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तू पाण्यावर तरंगत होत्या, तर हतबल नागरिक घरातील पाणी उपसत होते. बारामती हॉस्पिटलच्या तळघरात पाणी साचले होते. तर रस्त्यावर जागोजागी तळी साचली आहेत. नाझरे धरणातून कऱ्हा नदीमध्ये १५०० क्यूसेक्सने पाणी सोडल्याने कऱ्हा नदीला पूर आला आहे. तर नदीकडेच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी