पुणे, १६ ऑक्टोंबर २०२३ : महाराष्ट्रातून मान्सूनचे हवामान जवळपास निघून गेले आहे. मात्र, अजूनही अनेक भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसून येत आहे. एकीकडे महाराष्ट्रातील जनता ऑक्टोबरच्या उन्हाने त्रस्त आहे. मात्र, काही भागात हलका पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज कोकणात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. मात्र, मुंबई आणि परिसरात हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कडक उष्मा वाढला असल्यामुळे अनेक जिल्ह्यांत तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले. काल महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान अकोल्यात ३७.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मात्र, अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील जनतेला उन्हापासून दिलासा मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड