वर्षभरात तिसरा पक्ष! डॉ. हेमलता पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या

आधी काँग्रेस, मग शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट! वर्षभरात तिसऱ्यांदा पक्ष बदलत डॉ. हेमलता पाटील यांनी अखेर ‘घड्याळ’ हाती बांधलं आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केलं आहे.

डॉ. हेमलता पाटील या यापूर्वी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या होत्या. मात्र, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहिले आणि थेट महाराष्ट्र काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर रोख साधला होता. अखेर ११ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदासह प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.

यानंतर त्यांनी दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आश्वासने न पाळल्यामुळे आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी शिवसेनाही सोडली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. हेमलता पाटील यांची प्रवक्तेपदी नियुक्ती हा राष्ट्रवादीसाठी मोठा टप्पा मानला जात आहे. प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका आणि विचार मांडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा आवाज अधिक बुलंदपणे ऐकू येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील