जी-२० परिषदेसाठी जम्मूकाश्मीरमध्ये हाय अलर्ट, अतिरिक्त सैन्य तैनात

जम्मु-कशमिर: १२ मे २०२३: २२ ते २४ मे दरम्यान जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे जी-२० परिषद शांततेत पार पडावी यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. हा कार्यक्रम श्रीनगरमधील दल सरोवराच्या किनारी शेरे काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे आयोजित करण्यात आला. मात्र या बैठकीला पाकिस्तान संतापला असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.

माहितीनुसार, आयएसआयने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराच्या कर्नल सुलतानवर सोपवली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने पीओकेमध्ये चार नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. भिंबर, नीलम व्हॅली, लीपा व्हॅली रावलकोट आणि मुझफ्फराबाद येथे हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

जी-२० परिषद आणि परदेशी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी ६०० पोलिसांचे विशेष प्रशिक्षण उधमपूरमध्ये सुरू आहे. हे जवान सिव्हिल ड्रेसमध्ये पाहुण्यांच्या आसपास असतील. यासोबतच एनएसजी कमांडो आणि नौदलाचे मार्कोस पथकही तैनात करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि जम्मू शहरातही अतिरिक्त फौजा आधीच तैनात करण्यात आल्या आहेत आणि सीमेवरील पहाराही कडक करण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा