हाय रिस्क देशांतील ६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनची चिंता वाढली

मुंबई, १ डिसेंबर २०२१ : कोरोना विषाणूचे नवीन रूप ओमिक्रॉन जगभरात पसरत आहे. ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश सतर्क आहेत. भारतानेही दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांना उच्च जोखमीच्या देशांच्या यादीत स्थान दिले आहे. अति जोखीम असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत खबरदारी घेतली जात असून चाचणी, ट्रेसिंगवर भर दिला जात आहे.

दक्षिण आफ्रिका किंवा इतर उच्च जोखमीच्या देशांतील सहा लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सहा प्रवाशांपैकी एक मुंबई, एक कल्याण-डोंबिवली, एक मीरा भाईंदर कॉर्पोरेशन आणि एक पुण्याचा आहे. दोन प्रवासी नायजेरियातून आले आहेत. हे दोन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिका किंवा इतर उच्च जोखमीच्या देशांतील या संक्रमित लोकांचे नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रशासनाने त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, त्यांना एकतर कोणतीही लक्षणे नव्हती किंवा त्यांना सौम्य लक्षणे होती.

विशेष म्हणजे, कोरोनाच्या या नवीन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने राज्य सरकारांसोबत एक धोरण आखले आहे. उच्च जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. दक्षिण आफ्रिका तसेच झिम्बाब्वे, ब्राझील, ब्रिटन आणि न्यूझीलंड या देशांचा उच्च जोखमीच्या देशांच्या यादीत समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा