पोलिस भरतीत डॉक्टरसह वकील, अभियंते, एमबीए आदी १ हजार ६६१ उच्चशिक्षित उमेदवार रांगेत

औरंगाबाद, ६ जानेवारी २०२२ : सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सरकारी नोकरी मिळणे तर अवघडच आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल आहे. पोलिस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत चक्क आयुर्वेदिक डॉक्टर, अभियंता, पदवीधर रांगेत लागले आहेत.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस विभागातील ३९ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी तब्बल ५ हजार ७२५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात एक बी.एच.एम.एस., एम.डी. डॉक्टरसह ४० अभियंते, वकील, एम.बी.ए. आदी १ हजार ६६१ उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस मुख्यालयामागील मैदानावर सध्या पोलिस शिपाई पदासाठी धावण्यासह शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, या भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. या भरती प्रक्रियेत अन्य उच्चशिक्षितांसह एलएल.बी., एलएल.एम.ची पदवी घेतलेल्या दोन उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. सुरक्षित नोकरी प्राप्त करून भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने वर्तविली आहे.

पोलिस शिपाई पदासाठी १२ महिलांचीही भरती करण्यात येणार असून, त्यासाठी दीड हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, १० पोलिस निरीक्षक, ९ सहायक पोलिस निरीक्षक, १७ पोलिस उपनिरीक्षक, १३५ पोलिस अंमलदार काम पाहत आहेत.

पोलिस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेत एक बी.एच.एम.एस., एम.डी., एम.ई., बी.ई. असे अनुक्रमे ३ आणि ३७ मिळून ४० अभियंते, २५ बी.टेक., १५ एम.बी.ए. उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने भरती प्रक्रिया सुरू आहे.
– मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक.

औरंगाबादमधील एका महाविद्यालयात बी.टेक.च्या तृतीय वर्षांत शिक्षण घेत आहे. कंपन्यांमधून महाविद्यालयात आयोजित नोकरी मेळाव्यातही (कॅम्पस) नोकरीच्या संधी अनपेक्षितरीत्या उपलब्ध होत नाहीत. सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने पोलिस शिपाई पदाच्या भरतीत सहभागी झालो.
– विवेक, एक उमेदवार (नाव बदललेले आहे.)

उच्चशिक्षित अर्जदारांची संख्या
बी.एच.एम.एस., एम.डी. (०१), एम.ई. (०३), बी.ई. (३७), बी.टेक. (२५), एम.बी.ए. (१५), बी.फार्म. (१४), बी.कॉम. ( २०५), एम.कॉम. (२७), एम.एस्सी. (३५), एलएल.बी.-एलएल.एम. (०२), बी.एस्सी. अ‍ॅग्री (२६), बी.एस्सी. (४०७), बी.बी.ए.-बी.सी.ए. (४०), एम.ए. (९५), बी.ए. (७२९).

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा