इंदापूर, १० जून २०२३: गाय व म्हशींच्या दूधाला शासनाचा हमीभाव मिळावा, खासगी दूध संघावर शासनाचे नियंत्रण हवे या प्रमुख मागण्यांसाठी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे रास्ता रोको करण्यात आला. बारामती-इंदापूर या राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सुमारे एक तास रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
गायीच्या दुधाला ६० तर म्हशींच्या दूधाला ८० रुपये लिटर हमीभाव मिळावा, उस दराप्रमाणे दूधाला ७०/३० चा कायदा लागू करावा, गाई-म्हशींना शासकीय विमा मिळावा, खासगी दूध संघावर शासनाचे नियंत्रण असावे, इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील दूध उत्पादकाला पाच रुपये लिटर शासकीय अनुदान मिळावे, पशु वैद्यकीय सेवा व हंगामी लसीकरण झाले पाहिजे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते, प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय म्हस्के, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हधक्ष बाबासाहेब भोंग, विविध संघटनेचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. दूधाला दर वाढ मिळत नसल्याने कडाक्याच्या उन्हात शेतकरी रस्त्यावर जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी डोईफोडे यांनी निवेदन स्वीकारले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर