हिंदी चित्रपट सृष्टीचे पहिले सुपरस्टार “राजेश खन्ना”

‘बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं’… हे सर्वांच्या मनी ठसवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळख असलेले राजेश खन्ना यांचा आज जन्मदिवस. त्यांचे आयुष्य नेहमी प्रत्येकासाठी एक आदर्श राहिले. आज त्यांच्या जन्म दिवसानिमित्त काही गोष्टी…

राजेश खन्ना यांचं खरं नाव जतिन खन्ना असं होतं. त्यांच्या काकांच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदलून राजेश ठेवलं होतं. जम्पिंग जॅक ऑफ बॉलिवूड अशी ख्याती असलेले जितेंद्र आणि राजेश खन्ना यांनी एकत्रच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
जितेंद्र यांना चित्रपटाच्या ऑडिशनवेळी कॅमेरासमोर बोलायला राजेश खन्ना यांनी शिकवले होते.
तेव्हापासून जितेंद्र आणि त्यांची पत्नी राजेश खन्ना यांना ‘काका’ म्हणून हाक मारत असत. त्यानंतर चाहत्यांमध्येही त्यांचं काका या नावाने प्रसिद्ध झालं.
कारकीर्दीच्या असफल दिवसांमध्येही राजेश खन्ना यांचे स्पोर्ट्स कारवर असणारे प्रेम तसुभरही कमी झाले नव्हते. त्यावेळीसुद्धा राजेश खन्ना एम. जी. स्पोर्ट्स कार चालवत असत.
राजेश खन्ना यांना ज्योतिषविद्येत फार रस होता. ते या विषयावर बराच वेळ इतरांशी चर्चाही करत असत.
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्या मुलाच्या म्हणजेच आरवच्या ज्योतिषाचे भाकितही राजेश खन्ना यांनी केले होते. त्यासोबत आरवसुद्धा एक सुपरस्टार बनेल असा अंदाजही त्यांनी वर्तवला होता.
राजेश खन्ना अभिनयासोबतच पाककलेतही पारंगत होते. फोडणी दिलेली डाळ ते उत्तम बनवत.
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता-गायक किशोर कुमार आणि आर. डी. बर्मन हे राजेश खन्ना यांचे खास मित्र होते.
मुमताज आणि राजेश खन्ना यांच्या जोडीने रुपेरी पडद्यावर आजपर्यंत एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही.
राजेश खन्ना यांनी विविध अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण, त्यातही अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी जवळपास १५ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘आखरी खत’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतही स्थान मिळविले होते.१३ सुपरहिट चित्रपट देऊन त्यांनी त्याकाळात विक्रमच नोंदविला होता. १८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.
राजेश खन्ना यांचे त्यांच्या जावयासोबत म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारसोबत खूपच चांगले नाते होते. राजेश खन्ना अक्षयला ‘बडी’ (मित्र) म्हणून संबोधत असत. २९ डिसेंबर १९४२ रोजी पंजाब येथील अमृतसरमध्ये जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै २०१२ रोजी जगाचा निरोप घेतला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा