नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२२: चीनबाबत नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी इशारा दिलाय की, हा देश अजूनही आपल्यासाठी कठीण आव्हान आहे. चीनने केवळ भारताच्या जमिनीच्या सीमेवरच नाही तर सागरी सीमेवरही आपले अस्तित्व वावाढवलंय. अॅडमिरल कुमार म्हणाले की, नौदल हिंदी महासागर क्षेत्रावर सतत लक्ष ठेवून आहे.
अॅडमिरल कुमार यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे “भारताची नौदल क्रांती: महासागर शक्ती बनणं” या विषयावरील भाषणात देशासमोरील पारंपारिक आणि इतर सुरक्षा आव्हानांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आर्थिक अडचणी असूनही, पाकिस्तानने आपले सैन्य, विशेषत: नौदलाचे आधुनिकीकरण करणं सुरूच ठेवलं आहे, ज्याचा २०३०-२०५० पर्यंत मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाणार आहे.
या पारंपारिक लष्करी आव्हानांसोबत, दहशतवाद हे एक मोठे सुरक्षा आव्हान आहे कारण ते वाढतच आहे, असं ते म्हणाले. या वातावरणात भारतासमोर सुरक्षेबाबत आव्हाने कायम आहेत. ते म्हणाले की, चीनकडून सातत्याने आव्हाने मिळत आहेत. अशी परिस्थिती पाहता विरोधकांशी संभाव्य युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नौदल प्रमुख म्हणाले की, चीन या बाबतीत एक आव्हान कायम आहे आणि ते केवळ भूपातळीवरच नव्हे तर समुद्र पातळीवरही आपली उपस्थिती वाढवत आहे.
२००८ पासून चीन हिंद महासागर वाढवतोय वर्चस्व
ते म्हणाले की चीन २००८ पासून हिंद महासागरात आपलं अस्तित्व वाढवत आहे आणि त्याने जिबूतीमध्ये आपला लष्करी तळही बांधलाय. श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये हिंदी महासागरातील विविध बंदरांच्या निर्मितीमध्येही त्यांचा सहभाग आहे.
“कोणत्याही वेळी, पाच ते आठ चिनी नौदल तुकड्या हिंदी महासागरात दिसू शकतात, मग ते चिनी युद्धनौका असोत, चिनी संशोधन जहाजे असोत किंवा मासेमारी जहाजे असोत,” नौदल प्रमुख म्हणाले, आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. हिंदी महासागर क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भारतीय नौदलाची विमाने आणि जहाजे हिंद महासागर क्षेत्रावर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.
ते म्हणाले की, योजना आणि विकास धोरणे विशिष्ट देशासाठी तयार होत नाहीत. हे आमच्या संरक्षण गरजा आणि सागरी क्षेत्रातील हितसंबंधांना चालना देण्यावर आधारित आहेत.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएम) ४९ व्या अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, उद्याचं युद्ध केवळ समुद्रावरच नव्हे तर अनेक आघाड्यांवर लढलं जाईल हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जमिनीवर, हवेत, समुद्रावर, डिजिटल जगावर आणि आपल्या मनातही ते लढलं जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे