फलटण, सातारा १२ डिसेंबर २०२३ : फलटण येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथ उत्सव उद्या बुधवार मोठ्या उत्साहात, शाही पद्धतीने संपन्न होत आहे. फलटण शहरातील प्रमुख मार्गावरती श्री प्रभू रामचंद्र यांची रथयात्रा, ग्राम प्रदक्षिणा घालण्यासाठी फलटण शहरामध्ये निघणार आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये रथयात्रा निघणार असुन फलटणकर प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.
फलटण येथील श्रीमंत जानोजीराव नाईक निंबाळकर यांची सून श्रीमंत सगुणाबाई उर्फ आईसाहेब महाराज यांनी पूर्वीच्या ओट्यावर भव्य दगडी श्रीराम मंदिराचे बांधकाम केले. मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजावर नगारखाना आणि आकर्षक मेघडंबरी तयार केली आहे. देवालयात ठिकठिकाणी मुरलीधर, हणमंत, गरुड, लक्ष्मीनारायण, गणपती इत्यादी मुर्तीची स्थापनाही करण्यात आली आहे. देवालयातील मुख्य प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसाठी पेशवे सरकारकडील उत्तम गंडकी शिला आणून पुण्यामध्ये त्याकाळी प्रसिध्द असलेले मुर्तिकार बखतराम यांजकडून या मूर्ती करवून घेतल्याची नोंद संस्थानच्या कागदपत्रात आढळते. इ. स. १७७४ मध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या मुर्तीची धार्मिक विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. देवालयाचा नैमित्तीक खर्च भागविण्यासाठी श्रीमंत सगुणामातांनी फलटण तालुक्यातील विडणी हे गाव देवस्थानकडे कायम इनाम म्हणून दिले.
आजही ही फलटणच्या ऐतिहासिक नाईक निंबाळकर यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली जाते. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी सात ते आठ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन होऊन श्रींच्या मूर्ती सकाळी आठ वाजता श्रीराम प्रभूंचे रथात बसून शहरात ग्राम प्रदक्षिणेसाठी मिरवणुकीने जाईल. त्यानंतर सायंकाळी सात वाजता परत रथ मंदिरात येईल. या श्रीराम रथ यात्रा उत्सव निमित्त फलटण शहरांमध्ये पाळणे, मिठाईचे दुकाने सजली असून प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार