छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहासाच्या दृष्टीने स्वराज्याचे प्रतीक आहेत. त्यांनी सतराव्या शतकात आदिलशाही-मुघल सत्तेविरुद्ध लढून स्वराज्य उभे केले. दुसरीकडे टिपू सुलतान हे १८व्या शतकातील म्हैसूरचे शासक. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. दोघेही वेगवेगळ्या काळातील, वेगळ्या भूभागातील आणि वेगळ्या राजकीय परिस्थितीतील शासक, तरीही त्यांची तुलना केली जाते, तेव्हा ती इतिहासाच्या संदर्भात कमी आणि आजच्या राजकारणाच्या संदर्भात जास्त असते. त्यावरून जीभ छाटण्याची भाषा करणे, सत्ताधाऱ्यांनीच कायदा हातात घेणे हे प्रकार गंभीर आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानाशी तुलना आणि त्यावरून पेटलेला काँग्रेस-भाजप वाद हा केवळ ऐतिहासिक संदर्भांचा प्रश्न नाही, तर तो आजच्या राजकारणातील ‘ओळख राजकारणा’चा, मतदारधार्जिण्या भाषणांचा आणि इतिहासाच्या निवडक वाचनाचा भाग आहे. काँग्रेसकडून अनेकदा टिपू सुलतान यांना ‘ब्रिटिशांविरुद्ध लढणारा स्वातंत्र्यवीर’ म्हणून गौरवण्यात आले, तर भाजपकडून त्यांच्या कारभारातील धार्मिक धोरणांवर टीका करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सर्वपक्षीय आदर असला, तरी त्यांच्या वारशाचे ‘स्वामित्व’ घेण्याची स्पर्धा कायम आहे. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या सभागृहात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून वाद झाला. हा फोटो आता काढण्यात आला असला, तरी या वादात उडी घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केली. त्याची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनीच घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना जणू रानच मोकळे मिळाले. गेल्या सहा महिन्यांत दोनदा पुण्याच्या काँग्रेस भवनासमोर राडा झाला. एखाद्याविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार असला, तरी आंदोलन कुठेही करता आले असते; परंतु सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस भवनावर चालून जाणे हा चिथावणी देण्याचाच प्रकार आहे. त्यातच भाजपचा आमदारच सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्याला लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करीत असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या, नेत्या-कार्यकर्त्यांचा कायद्यावर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. सपकाळ यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे, तर पोलिस कारवाई करतील; परंतु तेवढाही धीर सत्ताधारी पक्षाला नाही. मतांच्या ध्रुवीकरणाच्या आणि २४ तास राजकारण करण्याच्या नादात संघ परिवार आणि भाजपच्या नेत्यांनी पूर्वी काय भूमिका घेतल्या होत्या आणि आता काय घेतल्या जातात, याचे भान राहिलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनाचे उदाहरण होते; तर टिपू सुलतान यांच्या कारभारात धार्मिक कट्टरतेची उदाहरणे दिसतात, असे भाजप म्हणतो. काँग्रेसचा प्रतिवाद असा, की टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रखर लढा दिला आणि त्यामुळे त्यांचे स्थान भारतीय प्रतिकाराच्या इतिहासात महत्त्वाचे आहे. दोन्ही पक्षांतील वाद हा केवळ इतिहासापुरता मर्यादित राहत नाही. तो लगेचच हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय अभिमान विरुद्ध अल्पसंख्याक तुष्टीकरण अशा चौकटीत ढकलला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी मुस्लिम सरदारांना पदे दिली, मस्जिदींचे रक्षण केले, स्त्रियांच्या सन्मानाचे धोरण राबवले. त्यामुळे त्यांना केवळ ‘धर्मयोद्धा’ म्हणून रंगवणे हे अर्धसत्य ठरते. त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांच्याविषयीही इतिहासात विविध मते आहेत. काही इतिहासकार त्यांना प्रगतिशील सुधारक म्हणतात, तर काही त्यांच्या कठोर धार्मिक धोरणांवर बोट ठेवतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली भावनिक बांधिलकी अतिशय तीव्र आहे. त्यामुळे त्यांची तुलना इतर कोणत्याही शासकाशी केली, तर त्यातून भावनिक प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. भाजपने या भावनांना साद घालत काँग्रेसवर ‘इतिहासाचा अपमान’ केल्याचा आरोप केला. काँग्रेसने मात्र ‘तुलना म्हणजे समानता नव्हे’ असा युक्तिवाद केला. त्यांच्या मते, दोघांनीही परकीय सत्तेविरुद्ध लढा दिला, एवढाच संदर्भ होता; परंतु प्रश्न असा आहे, की राजकीय नेत्यांनी तुलना करताना शब्दांची निवड किती जबाबदारीने करावी? कारण अशा विधानांमुळे समाजात अनावश्यक ध्रुवीकरण वाढते. भाजपसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय अभिमान आणि हिंदू अस्मितेचे प्रतीक आहेत. काँग्रेससाठी टिपू सुलतान हे ‘ब्रिटिशविरोधी प्रतिकार’ आणि ‘धर्मनिरपेक्ष वारसा’चे प्रतीक आहे. दोन्ही पक्ष आपापल्या मतदारवर्गाला साद घालण्यासाठी इतिहासातील व्यक्तिरेखा पुढे करतात. यातून मूळ प्रश्न विकास, रोजगार, शिक्षण, शेती आदी मागे पडतात.तुलना शास्त्रीय, संशोधनाधारित आणि संदर्भासह केली गेली, तर ती बौद्धिक चर्चेला चालना देऊ शकते; पण जर ती केवळ राजकीय लाभासाठी केली गेली, तर ती समाजात संशय आणि अविश्वास वाढवते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा सर्वांचा आहे. त्यांचे कर्तृत्व कोणत्याही एका पक्षाची राजकीय मालमत्ता होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांचा इतिहासही अभ्यासाचा विषय आहे, तो केवळ स्तुती किंवा निंदा यापुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही. राजकारण्यांनी इतिहासाचा वापर करावा; पण गैरवापर करू नये. कारण इतिहास हा केवळ भूतकाळाचा दस्तावेज नसतो; तो वर्तमानाच्या आणि भविष्याच्या सामाजिक सलोख्याचा पाया असतो. भारतीय राजकारणात इतिहास हा अनेकदा ‘निवडक स्मृतींचा’ खेळ बनतो. एका काळी ज्या व्यक्तीवर टीका केली जाते, त्याच व्यक्तीचे दुसऱ्या प्रसंगी राजकीय सोयीसाठी उदात्तीकरणही केले जाते. भाजपने कर्नाटकात टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता; परंतु ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षात टिपू सुलतान हे महत्त्वाचे नाव आहे, हे इतिहास नाकारू शकत नाही. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध चार अँग्लो-म्हैसूर युद्धे लढली आणि अखेर १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणम येथे मृत्यू पत्करला. पूर्वी भाजपकडूनही टिपू सुलताना यांचा उल्लेख ‘ब्रिटिशांविरुद्ध लढलेला शूर योद्धा’ म्हणून करण्यात आला होता. आता प्रश्न उपस्थित होतो, की ही भूमिका आधीच्या टीकेशी विसंगत नाही का? जर त्यांच्या धार्मिक धोरणांवर टीका करायची असेल, तर त्यांच्या ब्रिटिशविरोधी लढ्याचे कौतुक का? आणि जर ते ब्रिटिशांविरुद्ध लढणारे नायक असतील, तर त्यांच्या जयंतीला विरोध का?भाजप असो किंवा काँग्रेस; इतिहासाचा वापर करताना सातत्य आणि प्रामाणिकपणा अपेक्षित आहे.
एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आणि दोष दोन्ही मान्य करण्याची प्रामाणिकता राजकारणात क्वचितच दिसते. परिणामी, समाजात संभ्रम निर्माण होतो आणि इतिहासाविषयीचे आकलन अधिकच ध्रुवीकरणाकडे झुकते. टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण किंवा टीका या दोन्ही गोष्टींपलीकडे जाऊन, इतिहासाकडे अभ्यासपूर्ण आणि संतुलित नजरेने पाहणे ही काळाची गरज आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतान यांचे कौतुक करताना म्हटले, की टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढताना वीरमरण पावला. तो म्हैसूर युद्धात रॉकेट वापरण्यातही अग्रणी होता. या विधानामुळे अस्वस्थ झालेल्या भाजप प्रवक्त्यांनी कोविंद यांना कर्नाटक सरकारने खोटी माहिती पुरवल्याचे सांगून बचाव केला. २०१२ मध्ये अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव ‘शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान’ ठेवण्याचा ठराव भाजपनेच मांडला. माजी महापौर व सध्याचे भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल होते. २०१३मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ नाव देण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी आणला होता आणि त्यात सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव असेल, असे भाष्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आणि त्यासाठी पुरावेही दिले. २००१ – अंधेरी (प) येथे ‘शेरे म्हैसूर टिपू सुलतान’ मार्ग भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजप नगरसेवकांच्या मांदियाळीत झाले. भाजप नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले. त्याचाही पुरावा आहे. त्यावर आंदोलकांकडे उत्तर नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे टिपू सुलतना यांच्याबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. २०१० मध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला येदियुरप्पा यांनी टिपू यांचा शिरपेच सजवला होता. १९७० च्या दशकात संघाने टिपू यांचे कौतुक करणारे एक पुस्तक प्रकाशित केले होते, त्यात त्यांना देशभक्त म्हटले होते. हे पुस्तक भारत भारती मालिकेचा भाग होते. टिपू यांनी दरबाराची भाषा म्हणून फारसी का वापरली? असा प्रश्न भाजपचे काही लोक करतात. ते हे विसरतात, की त्या वेळी उपखंडात फारसी ही दरबाराची भाषा होती. छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या पत्रव्यवहारात फारसी वापरत होते आणि मौलाना हैदर अली यांना त्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले होते. आज टिपू सुलतान यांचे ज्याप्रमाणे वर्णन केले जाते, तसे ते कट्टर धार्मिक नव्हते. त्यांची धोरणे धर्माने प्रेरित नव्हती, असे इतिहासकार सांगतात.
कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना लिहिलेल्या पत्रात ते आचार्यांचा उल्लेख जगतगुरू असा करतात. त्यांनी त्यांच्या मंदिराला भरपूर भेटवस्तूही दान केल्या. जेव्हा पटवर्धनांच्या मराठा सैन्याने शृंगेरी मठ लुटला, तेव्हा टिपू सुलतान यांनी आदरपूर्वक मठाचे वैभव परत मिळवून दिले. त्याच्या कारकिर्दीत दहा दिवसांचा म्हैसूरचा ‘दशहरा उत्सव’ हा सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होता.त्यांनी काही समुदायांचा छळ केला हा आरोप खरा आहे; परंतु या छळाचे कारण धार्मिक नव्हते, तर पूर्णपणे राजकीय होते. या छळाबद्दल इतिहासकार केट ब्रिटलबँक म्हणतात, की हे धार्मिक धोरण नव्हते, तर शिक्षेचे धोरण होते. त्यांनी ज्या समुदायांना लक्ष्य केले, ते केवळ हिंदू नव्हते, तर त्यात महदवींसारख्या काही मुस्लिम समुदायही होते. शिवरायांनाही स्वकीयांविरुद्ध लढावे लागले होते, हे विसरता येणार नाही.
भागा वरखडे
