Hit and Run Pune Mumbai Highway Case: पुणे-मुंबई महामार्गावर मंगळवारी (दि.१५ एप्रिल) मध्यरात्री अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन सख्ख्या भावांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि होत्याचे नव्हते झाले. योगेश राजोरिया (वय ३२) आणि दीपक राजोरिया
(वय ३४, दोघेही रा.पारशीचाळ,देहूरोड) अशी या दुर्घटनेतील दुर्दैवी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, एकच हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण अपघाताची फिर्याद मृतांचे बंधू रूपेश जगन्नाथ राजोरिया यांनी बुधवारी देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याचा कसून शोध सुरू केला आहे.
देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश आणि दीपक हे दोघे भाऊ मंगळवारी रात्री आपल्या कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून आपल्या घरी निघाले होते. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड दरम्यान त्यांच्या दुचाकीला मागून एका वेगवान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली. अज्ञात वाहनचालक घटनास्थळी क्षणभरही न थांबता, तसेच या दोघांना वैद्यकीय मदतीची गरज असतानाही कोणतीही मदत न करता तेथून पसार झाला.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी सिग्नल बंद असल्याने वाहनचालक बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने वाहने चालवतात, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. निगडी ते देहूरोड या मार्गावर रात्रीच्या वेळी पोलिसांनी तपासणी नाके उभारावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अनेकदा भरधाव वेगामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत आणि या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
एका क्षणात होत्याचे नव्हते करणाऱ्या या ‘हिट अँड रन’च्या घटनेने राजोरिया कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाला लवकरात लवकर शोधून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे