नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2021: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 3-1 ने पराभव केला. टीम इंडियाचा स्टार हरमनप्रीत सिंगने चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियासाठी तिसरा गोल करत विजय निश्चित केला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा शानदार सामना जिंकून टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने या सामन्यात दोन गोल केले. यातील पहिला आठव्या मिनिटाला आणि दुसरा 53व्या मिनिटाला आला. दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाले. तर आकाशदीप सिंगने सामन्याच्या 42व्या मिनिटाला गोल केला. पाकिस्तानसाठी एकच गोल होता, जो जुनैद मंजूरने 45व्या मिनिटाला केला.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने बांगलादेशचा 9-0 असा पराभव केला होता, तर पाकिस्तान अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पाकिस्तानचा पहिला सामना जपानविरुद्ध होता, जो अनिर्णित राहिला होता.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा संघ सध्या जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला सात मिनिटे बाकी असताना टीम इंडियाकडून तिसरा गोल झाला.
पाकिस्तानवरच्या या धमाकेदार विजयासह टीम इंडिया आता 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 मध्ये भारत-पाकिस्तान संयुक्त विजेते होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे